जेव्हा देणगीच सेवाभारती ची वाट पाहत असते

  • Post author:
  • Post category:Activities

काल एक वैशिष्ट्यपूर्ण असा चांगला अनुभव आला.

एका आजीबाईंना त्यांच्या बांधवांकडून वडिलोपार्जित जमीन जायदादीतील उत्पन्नातून काही रक्कम मिळाली. आजीबाई सुखवस्तू घरातील, त्यामुळे त्यांना खरंतर असा हिस्सा पाहिजेच अशी त्यांची इच्छाही नव्हती. आता अशी अनपेक्षित रक्कम मिळालीच आहे तर मुलांनी व्यापारात गुंतवावी म्हणून मुलांना देऊ केली, पण मुलंही व्यापारात चांगले यश प्राप्त केलेले असल्याने त्यांनी सांगितले की या रकमेचा तुला कसा, काय आणि कुठे विनियोग करायचा ते तुझं तू ठरव, आमची याला काहीही हरकत असण्याचे कारण नाही.
मग भावांनी मोठ्या मनाने दिलेल्या रकमेपैकी काही धनराशी चांगल्या कार्यासाठीच दान द्यावी, अशी इच्छा आजींनी व्यक्त केली. मुले, सुना, नातवंडे सर्वांनी त्याला सहमती दर्शवली.

आजींना सेवाभारतीच्या कार्याची स्थापनेपासूनच माहिती होती, ती महाजन गुरुजींचे या घराशी असलेल्या ऋणानुबंधामुळे. आजींचे माहेरचे घर म्हणजे जणू संघाचेच घर. त्यात आजींचे चिरंजीव गुरूजींचे विद्यार्थी. त्यामुळे रूपये 365/- ची पावती करण्यासाठी गुरूजी वर्षातून एकदा आवर्जून घरी येत असत (अॉफिसमध्ये नाही). मुळात महाजन गुरुजी म्हणजे सेवादूत व त्यात या घराशी त्यांचे घनिष्ठ संबंध, शिवाय 365/- रु. ची देणगी देण्याची प्रचंड उर्मी, यामुळे आजी दररोज देवपूजा करताना एक रुपया सेवाभारतीचा म्हणून बाजूला काढून ठेवतात, तेही अगदी न चुकता. (सेवाभारती च्या स्थापनेपासून ही योजना सुरू आहे, समाजातील प्रत्येकाने रोज एक रूपया प्रमाणे वर्षाचे 365/- रूपये एकदाच द्यायचे, त्यातूनच सेवाभारतीच्या कार्याचा विस्तार झालेला आहे.)

सेवाभारती ला नेहमी पेक्षा अधिक रकमेची देणगी द्यायची आपली इच्छा आजींनी गुरूजींना बोलून दाखवली. गुरूजींनी सेवाभारती च्या विश्वस्त मंडळींना ही माहिती दिली खरी पण बघता बघता कोरोना आला. काळाच्या ओघात गुरूजींना पण पुन्हा आजींना भेटायचे झाले नाही. इकडे आजींनी अनेक वेळा गुरूजींना निरोप देण्याचा, भेटायचा प्रयत्न केला पण गुरूजी फोन वापरत नसल्याने ते शक्य झालं नव्हतं. आजींनी अन्य माध्यमातून सेवाभारती मध्ये सम्पर्क करण्याचा प्रयत्न केला पण योग्य ठिकाणी सम्पर्क झाला नव्हता, त्यामुळे हे काम राहूनच गेले होते.

यावर्षी कोरोनानंतर ची परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने परवा गुरूजींचे या घरात जाणे झाले, घरी मुलगा नव्हता, त्यामुळे एक वेळ आजींच्या मनात काही आले असेल, आणि विचारले मुलगा आल्यावर याल का ? पण नाही, शेजारीच बसलेल्या सुनबाई म्हणाल्या गुरुजी बर्‍याच दिवसांनी आलेले आहेत, हे काम आपण आजच करू व शांतपणे त्यांनी ही रक्कम आजींच्या हातात दिली. आणि आजींनी क्षणाचाही विलंब न करता देणगीची रक्कम गुरूजींच्या हाती सुपूर्द केली. दोन वर्षापासूनची आपली मनिषा पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता.

ज्या सहजतेने व निरपेक्षपणे हे सर्व घडत होते की, आम्ही तर भारावूनच गेलो होतो. त्या म्हणाल्या होत्या की माझे माहेर संघाचेच आहे. हे ऐकल्यावर अधिक चौकशी केली. त्या नगर जिल्ह्यातील बेलापूरच्या, बेलापूर हे गाव म्हणजे तेथील प्रत्येक घर हे संघाचेच, त्या सांगत होत्या.. घरची परिस्थिती बेताचीच पण वडील प्रचारकांना घरी घेऊन यायचे, ते जेवायला ही असायचे, आहे त्यात आनंद मानायचो. माझ्या घराच्या ओसरीवर डॉ. हेडगेवार, गुरुजी, शिवाजी महाराज यांचे फोटो आहेत. त्यांचं लग्न 1965 साली झाले, पण दुर्दैवाने पतीचे अकाली अपघाती निधन झाले, मुलाला नववीमध्ये असतानाच शाळा सोडावी लागली व वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले. मुलगा संघाचा स्वयंसेवक, त्याचे मित्र व महाजन गुरुजींचा संपर्क हा येतच राहिला. माऊली पण डगमगली नाही त्यांनी संघाचा संबंध जाणून बुजून तोडला नाही. मुलगा केवळ नववी शिकलेला असून ही तो आज व्यवसायात मोठा यशस्वी झाला आहे. याचे श्रेय त्या संघ संगतीलाच देतात. संघाचे घर, कार्यकर्ते प्रचारक यांचा संपर्क, माऊलीच्या मनात संघाचे काम म्हणजे देशाचे काम, चांगले काम हा पक्का दृष्टीकोन. आज कदाचित तो संघाच्या रोजच्या कामात नसेल, ते घर आमच्या पटावरही नसेल पण संघ संस्कार कोणता दृष्टिकोन देऊन जातो व कसा एखाद्या घरातील वातावरणावर दूरगामी परिणाम करतो याचे प्रत्यंतर आम्ही त्या घरात घेत होतो.

हा प्रसंग कॅमेर्‍यात टिपण्यासाठी आम्ही या ठिकाणी होतो परंतु या आजींना त्यांचे नाव, फोटो कुठेही नको असल्याने फोटो काढला नाही, आणि नावाचा उल्लेख ही करत नाहीये पण व्यक्ति पेक्षाही प्रवृत्ती चा नक्कीच उदोउदो व्हावा, यासाठी हे लेखन प्रपंच..