युवा कौशल्य विकास योजना

सेवाभारती, इचलकरंजीतर्फे १० आणि १२ वी ची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवा कौशल्य विकास योजना हा उप्रकम राबवला जातो. १० वी आणि १२ वी झालेल्या विद्यार्थ्यांना करियरसाठी एक शाखा निवडावी लागते. स्वतःच्या क्षमता आणि गुणवत्ता यांबद्दल जर एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी जाणीव नसेल, मित्र – कुटुंबीय यांच्या सांगण्यावरून प्रभावित झाला असेल किंवा सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या शाखांकडे ओढा असेल तर अनेकदा स्वतःच्या गुणवत्तेनुसार आणि आवडीकडे डोळेझाक करून वेगळी शाखा अनेक जण निवडतात. पण संबधित शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्या शाखेत करियर न करण्याचा निर्णय विद्यार्थी घेतात. त्यामुळे त्यांचे पैशाचे नुकसान तर होतेच पण कधीही न भरून निघणारे वेळेचे नुकसान सुद्धा होते. याउलट जे विद्यार्थी स्वतःच्या क्षमता आणि गुणवत्ता यांचा पूर्ण विचार करून कशानेही प्रभवित न होता योग्य ती शाखा निवडतात ते त्यांचा करियरचा आनंद घेऊन त्यात उत्तुंग भरारी मारतात असं करियर सायकोलॉजी म्हणते. याच स्व क्षमता आणि आवडीची जाणीव विद्यार्थ्यांना होऊन करियरची योग्य निवड करता यावी आणि सुट्टीचा सदुपयोग करता यावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

फेब्रुवारी पासून या योजनेला सुरुवात होते. मार्च पर्यंत या योजनेचे रजिस्ट्रेशन करून विद्यार्थ्यांचे एकदिवसीय स्व विकास शिबीर आयोजित केले जाते. या शिबिरात त्यांना योजनेविषयी पूर्ण माहिती देऊन १५ एप्रिल ते ३१ मे पर्यंत त्यांचे आवडीचे करियर असणाऱ्या कंपनीत विद्यार्थ्यां काम करतात अशा प्रकारे ही योजना चालते.

रजिस्ट्रेशन ते स्व विकास शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांचे करियर विषयक कौन्सेलिंग केले जाते. या मध्ये त्यांची क्षमता, कल आणि आवड कोणत्या करियर कडे झुकत आहे या बद्दल त्यांच्याशी चर्चा केली जाते. आणि त्यांना योग्य आणि आवडीचे काम देऊ शकतील अशा क्षेत्राची निवड करण्यास मदत केली जाते.

याचे दुहेरी फायदे होतात. जर खरच आवडीचं क्षेत्र मिळालं तर कोणत्या क्षेत्रात करियर करावं याची कल्पना विद्यार्थ्यांना येते आणि जर आवडीचं क्षेत्र नाही मिळालं तर कोणत्या क्षेत्राची आपल्याला आवड नाही किंवा आपला त्यांचा कल नाही याची कल्पना विद्यार्थ्यांना येते.