गणित मांडून आणि योजना करून सेवाकार्य कधी होत नाही. त्यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून अडचणी सोडवत काम करत राहिले कि, शिक्षण आरोग्यासह अनेक विभागात मोठे कार्य होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी उर्फ सुरेश जोशी यांनी येथे केले. येथील सेवा भारती संचालित श्री. माधव विद्या मंदिर या शैक्षणिक नूतन भव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा भैय्याजी जोशी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
एक वेगळा दृष्टिकोन ठेवून कर्तव्य भावनेतून समाजाच्या सहकार्यातून उभी राहिलेली ही संस्था आहे. एखादा किंवा समूह याचा मालक नाही, तर संकल्प घेऊन जाणारी शक्ती आहे. नैसर्गिक संकटात व संकट नसताना समाजाचे प्रश्न सोडविणे, त्याची पूर्तता करणे, हे आपले काम म्हणून संघ स्वयंसेवकांनी प्रेरित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध सेवा कार्याची माहिती देताना त्यांनी देशात शाळा आहे पण शिक्षण नाही असा अनुभव आहे. म्हणून स्थानिकांच्या मदतीने २५ ते ३० हजार गावात असे कार्य सेवा भारतीने उभे केले आहे. अनेक वसतिगृह उभारले आहेत. शासन असे उपक्रम राबवित आहेच. पण आम्ही सेवा भावनेतून कार्य करतो. विनामोबदला हजारो आरोग्यरक्षक उभारले आहे. सामाजिक संवेदनातून हे घडत आहे. हे कार्य अवघड नाही आणि सोपेही नाही. या कार्यातून बक्षीस नाही आणि सन्मान नाही तर सेवा हा भाव त्यामागे आहे. समाजासाठी चालू केलेले हे कार्य पूर्णतेसाठी समाजातून आर्थिक पाठबळ मिळत राहते. देणारा आणि घेणारा उपकाराच्या भावनेने नाही तर जबाबदारीने काम करतो. यात आनंद भाव असतो. मुलांची अडचण आईलाच कळते आणि ती त्याची सेवा करत असते. असेच आईसारखे काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वनवासी, वंचित, दलित असा एक वर्ग आहे. तर दुसरा संपन्न वर्ग आहे या दोघांना जोडण्याचे काम करणे ही संधी आहे, असेही भैय्याजींनी सांगितले.
प्रारंभी, सेवा भारती इचलकरंजीचे अध्यक्ष श्री. भगतराम छाबडा यांनी प्रास्ताविक केले. ३२ वर्षांच्या काळात प्रथम प्राथमिक व आता माध्यमिक शाळा चालू केले असून शहरातील दानशूर लोकांच्या मदतीतून भव्य वास्तू उभारल्याची माहिती त्यांनी दिली. तर शालेय व्यवस्थापन समितीचे संचालक नरेंद्र कुलकर्णी यांनी इमारत उभारणी कामातील मान्यवरांची माहिती सांगितली. तर मुख्याध्यापिका स्वाती शिंदे यांनी शाळेतील विविध उपक्रम आणि सांस्कृतिक भूमिका यांची विस्तारित माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उत्तर कोल्हापूर जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, तालुका संघचालक रमेश लाहोटी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग धोंडपुढे होते. शेवटी सामूहिक पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता