सेवाभारती संचलित,माधव विद्यामंदिर, इचलकरंजी


विद्यार्थ्यांना केवळ परिक्षार्थी न बनवता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणारी म्हणून ओळख असणारी इचलकरंजी शहरातील माधव विद्यामंदिर शाळा आहे. इचलकरंजी परिसरातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ही ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील तसेच सामान्य यंत्रमाग कामगारांची मुले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघाने देशभर सेवा कार्याचे जाळे निर्माण करण्याचा विचार केला होता. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी मध्ये १९८९ साली सेवाभारती या संस्थेची स्थापना केली व त्या अंतर्गत फिरते रुग्णालय सुरू करून आरोग्य क्षेत्रात काम सुरू झाले. त्याचेच आज फिरत्या रुग्नालायाबरोबर इचलकरंजी येथे मध्यवर्ती ठिकाणी ३२ खाटांचे २४ तास सेवा उपलब्ध करून देणारे सर्वसामन्यांचा आधारवड ठरलेले मोठे डॉ. हेडगेवार हॉस्पिटल सुरु झाले आहे. त्यावेळी असं लक्षात आलं की इचलकरंजी हे शहर देशांमध्ये वस्त्र नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे महाराष्ट्र व अन्य राज्यातील कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कामगारांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आरोग्याबरोबरच त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे त्यांची मुलं शिकून सवरून मोठी झाली पाहिजेत, याचा विचार करून संस्थेने शिक्षण क्षेत्रातील सेवाकार्य सुरू करायचं ठरवलं आणि त्यातूनच माधव विद्यामंदिरची २००२ साली सुरुवात झाली.
२००२ साली बालवाडी पासून सुरुवात झालेली शाळा आज अखेर १० वी पर्यंत शिक्षण देणारी प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागाच्या सुसज्य अश्या इमारतीनी सज्ज आहेत.
शाळा स्वयं अर्थसहाय्यित असून ही मुलामुलींची एकत्रित शाळा आहे. शाळेत प्रवेश घेताना कोणत्याही स्वरूपात देणगी घेतली जात नाही. शाळेत सुमारे ४५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुमारे २५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अखंड ज्ञानदानाचे काम करत आहेत.
शाळेची वैशिष्ट्ये म्हणजे, इथे मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं. ई लर्निंग सुविधा, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, शहरातल्या अनेक शाळांना जे उपलब्ध नसतं असं शारीरिक तंदुरुस्ती साठी उपयोगी पडणारं प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, स्पर्धा परीक्षासाठी विशेष तयारी करुन घेणं असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात.
शाळेमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबविले जातात.
 विद्यारंभ संस्कार :- शाळेत इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परिसरातील श्री गणेश मंदिरात नेऊन आईच्या हस्ते पाटीवर श्री लिहून विद्यारंभ संस्काराने शाळेची सुरुवात होते.
 आषाढी एकादशी :- आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरामध्ये पायी दिंडीचे आयोजन केले जाते. यावेळी सर्व मुले वारकरी वेशभूषेमध्ये सहभागी होतात.
 रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व मुले-मुली एकमेकांना राख्या बांधून हा दिवस साजरा करतात.
 गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने शाळेमध्ये दहीहंडीचा उपक्रम राबविला जातो. यावेळी मुले दहीहंडी फोडून चिखल व पाण्यांमध्ये खेळण्याचा आनंद घेतात.
 श्रावण महिन्यामध्ये केळीच्या पानावर जेवण करण्याचा उपक्रम काही वर्गामध्ये घेतला जातो. केळीच्या पानातील पॉलिफेनॉल नावाचा घटक नैसर्गिक एण्टी ऑक्सीडेंट म्हणून काम करतो, त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुरळीत चालू राहतो, तसेच अन्न शुद्ध होऊन अन्नपचन सोपे होते. हा वैज्ञानिक दृष्टीकोन मुलांना समजावा या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येतो.
 दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्व व माहिती समजावी म्हणून प्रत्यक्ष मांडणी केली जाते. त्याचबरोबर आकाशकंदील व पणत्या लावून, किल्ले करून दिवाळी साजरी केली जाते.
 १४ फेब्रुवारी हा प्रेमिकांचा दिवस न मानता सर्व पालकांना बोलावून प्रत्येक विद्यार्थी आपल्या आईवडिलांची पाद्यपूजा करून आई वडिलांविषयी आदर व्यक्त करतो.
 आणखी एक यशस्वी उपक्रम म्हणजे निवासी बालचेतना शिबीर. यामध्ये सर्व विद्यार्थी दोन दिवस शाळेमध्ये राहतात व हस्तकला, मातीकाम, खाण्याचे पदार्थ स्वतः तयार करणे. संगीत, आकाशदर्शन इ. विविध उपक्रम करण्यात विद्यार्थ्यांचे दोन दिवस कसे जातात हे कळत नाही. शिबिरातील एक अतिशय स्तुत्य संकल्पना म्हणजे मातृहस्ते भोजन. पहिल्या दिवशी रात्री पालकांनी जेवण करून आणायचे आणि ते आपल्या मुलासोबत न बसता दुसऱ्या मुलासोबत बसून जेवण करायचे असा हा उपक्रम असून या निमित्ताने दोन कुटुंबांची छान ओळख होते. वेगळ्या लोकांबरोबर गप्पा होतात.
 शाळेमध्ये प्रत्येक वर्गांमध्ये ग्रंथालय असून आठवड्यातून एकदा पुस्तकांची देवाण-घेवाण केली जाते व प्रत्यक्ष अन्य पुस्तक वाचनाचा सराव ही होतो.

याबरोबर दर शनिवारी शाळेमध्ये “शनिवार उपक्रम” या अंतर्गत विविध विषयांची प्रत्यक्ष माहिती, निरनिराळ्या चित्रफिती, विविध स्थळांना भेट, विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलांनी घेतलेली मुलाखत, प्रत्यक्ष बुक बायडिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रिकल जोडणी, संगीत व वाद्यांची ओळख असे प्रत्यक्ष अनुभव देणारे साधारण ३० ते ३५ उपक्रम राबविले गेले आहेत.
अर्थात हे सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अनेक विषयांचा अभ्यास करून ते मनापासून राबविण्याचा प्रयत्न करत असतात. यात संचालक मंडळाचा ही प्रत्यक्ष सहभाग असतो.
ही शाळा स्वयं अर्थसाहय्यीत असल्याने समाजातील विविध स्तरातील व्यापारी, नोकरदार, सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आर्थिक सहाय्यातून चालवलेली आहे. असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी भरघोस आर्थिक मदतीची गरज असते व ती अनंत हस्ते मिळविण्याचा प्रयत्न असतो.
या सर्वांचा उद्देश अभ्यासात प्रथम असण्याबरोबरच आपल्यामध्ये कोणते कलागुण आहेत हे दहावी पर्यंत विद्यार्थ्याच्या लक्षात यावे अशी रचना आहे. नवीन शिक्षण नीती कशी राबविता येईल त्याच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल, केवळ पैसा व नोकरी हे ध्येय न ठेवता श्रममूल्य जाणणारा विद्यार्थी, समाजाचे काही देणे लागतो अशी मानसिकता तयार होईल अशी रचना कण्याचा शाळेचा उद्देश आहे. सर्वांसमोर आदर्श निर्माण होईल अशी शाळा उभी करण्याचा मानस आहे

Leave a Reply