इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहराची गरज ओळखून 1989 साली इचलकरंजी शहरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने सेवाभारती नावाने रुग्णसेवा सुरु केली. आजही अखंडीत ही सेवा सुरु आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर नित्यनिमाने सेवा बजावतात. तीही विनामुल्य.
रामभाऊ राशिनकर, रामनिवास लाहोटी, यांनी या सेवा कार्याचा विडा उचलला. यासाठी समाजातील सदन वर्गाच्या सहाय्याने दुर्बल घटकांसाठी सेवा ही कार्यपद्धती अवलंबली. यासाठी प्रथमतः लॉपॅथी उपचारासाठी सुसज्ज असे डॉक्टर हेडगेवार फिरते रुग्णालय उभारून शेजारील आठ खेड्यात व शहरातील लालनगर झोपडपट्टीत (सेवा वस्ती ) आरोग्यसेवा सुरु केली. प्रतीवर्षी जवळपास 35 हजारांहून अधिकांना रुग्णसेवा दिली जाते.
1993 चा किल्लारीचा भूकंप, 1998 चा कारगीलचा संग्राम, 2002 साली गुजरात मधील कच्छला झालेला भूकंप, 2005 साली सांगली, कोल्हापूर आलेला महापूर व नुकताच 2018 साली पश्चिम महाराष्ट्रात आलेला महाभयानक महापूर. या सार्या वेळी सेवाभारतीने सुसूत्रतेने केलेले मदतीचे नेटके नियोजन केले होते.
प्रतिदिन केवळ 1 रुपया असे वर्षाचे 365 हीच सेवाभारतीची वर्गणी होय. यातून गोळा होणार्या निधीतून सेवाभारती आपले सेवाकार्य चालवते. कार्य पाहून अनेक देणगीदार पुढे येतात व मदत देतात, त्यामुळे गरज मोठ्ठी आहे हे ही जाणवते.
ही आरोग्य सेवेची गरज ओळखून 2011 साली इचलकरंजी शहरात डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल या नावाने 32 खाटांचे हॉस्पिटल सुरु झाले. या ठिकाणी 24 तास बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे. या ठिकाणी शहरातील विविध रोगांवर उपचार करणारे डॉक्टर विशेष प्रयत्नातून एकत्र आणून पॉलिक्लिनिक सुरु केले. सर्व प्रकारच्या रोगांवर कमी खर्चात योग्य उपचार व्हावेत ही त्यामागील कल्पना. आज या हेडगेवार रुग्णालयात सर्व प्रकारच्य रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतात. मानसिक दृष्ट्या दुबळे, शारीरिक दृष्ट्या दुबळे व आर्थिक दृष्ट्या दुबळे अशा सर्व रुग्णाना तितक्याच तत्परतेने सेवा दिली जाते व मुख्यत्वे करून सेवेतून सेवा या भावनेने रुग्णाना देखील सेवेसाठी प्रवृत्त केले जाते. समाज आपला आहे समाज सुस्थितीत राखणे हीच तर माणुसकीची शिकवण आहे व ती पाळली तर समाजाचे ऋण फेडल्याचे समाधान आपल्याला मिळेल व हेच समाधान मिळविण्यासाठी अनेकानी आपले तन, मन व धन समर्पित केले आहे. तोच कित्ता आज सेवाभारती आज गिरवित आहे.