सेवाभारती इचलकरंजीचे डॉ हेडगेवार फिरते रुग्णालय ज्या बारा ग्रामीण व सेवावस्ती केंद्रांवर सेवा देते त्या परिसरातील शाळांमध्ये मागील दोन तीन महिन्यात शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. या दरम्यान फिरत्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बाळकृष्ण होशिंग यांचे त्या शाळांमधील शिक्षक वर्गाशी खूप चांगले संबंध निर्माण झाले. एकमेकांच्या भूमिका बद्दल काळजी,चर्चा सुरू झाली. त्यामधून या सर्व शिक्षकांचे एक एकत्रीकरण ठरले. शिक्षकांची आरोग्य तपासणी व त्याला जोडून “शिक्षण, संस्कार व कुटुंब- शिक्षकाची भूमिका” असा विषय मांडायचा ठरला. कुटुंब प्रबोधन विषयाचे सांगलीचे जिल्हा संयोजक श्री महादेव जोगळेकर यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी सौ अनघा लिमये यांचे नाव सुचवले.
प्रत्यक्ष कार्यक्रमात आठ स्थानातून ३२ शिक्षक व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. त्यातही महिला शिक्षकांची संख्या उल्लेखनीय होती. सौ अनघाताईंनी अत्यंत ओघवत्या शैलीत PPT च्या आधारे विषय मांडला. खरतर विषय मांडला नाही तर त्यांनी या विषयावर सर्वांशी सहज गप्पा मारल्या संवाद साधला. बालक,पालक,शिक्षक यांचा संवाद,संबंध,एकमेकांवरील प्रभाव व त्याचे दूरगामी परीणाम या विषयी त्या सहजतेने बोलल्या. पालक सभांची आवश्यकता,त्यांची वारंवारीता,त्यात हाताळायचे विषय याची मांडणी केली.
बालक पालक संभाषण,त्यांना निर्णय स्वातंत्र्य देणे मुलांच्या योग्य निर्णयांचा आदर करणे, गैर गोष्ट योग्य वेळी योग्य पद्धतीने सांगणे याविषयी सुरेख उदाहरणे अनघाताईंनी दिली. विविध वयोगटातील मुलांच्या मूल व विद्यार्थी म्हणून अपेक्षा समजून घेण्याची आवश्यकता त्यांनी पटवून दिली. अवास्तव अपेक्षा न बाळगता जीवनातील आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन यश मिळवण्यासाठी विध्यार्थ्यांना घडवणे ही शिक्षक व पालकांचा खरी भूमिका आहे याची नेमकी मांडणी झाली.
बालकाच्या घडण्यात कुटुंब एक प्रभावी घटक आहे,या कुटुंबाच्या सध्याच्या स्थितीची व आदर्श कुटुंब व्यवस्थेचा आढावा घेतला. एकूणच उपलब्ध कमी वेळेत विषयाची यशस्वी मांडणी अनघाताईंनी केली. एका केंद्रशाळेच्या मुख्याध्यापकांनी या विषयातील प्रत्येक बिंदूवर विस्तृत मांडणी झाली पाहीजे अशी आवश्यकता व्यक्त केली. या चर्चेतून पुढच्या काळात या विषयावर एक पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेण्यावर सर्वांचे एकमत झाले. जे शिक्षक आज येऊ शकले नाहीत त्यांच्या पर्यंत ही माहिती आम्ही पोहोचवू अशी ग्वाही आलेल्या शिक्षकवृंदानी दिली. एकूणच आरोग्य, शिक्षण,संस्कार व कुटुंब असा एकत्रीत संगम आजच्या या शिक्षक एकत्रिकरणात अनुभवता आला.
डॉ राजेश पवार, डॉ हेडगेवार रुग्णालय, सेवाभारती, इचलकरंजी, जिल्हा-कोल्हापूर.