शाहूवाडी फिरते रुग्णालय प्रकल्प
सेवाभारती, इचलकरंजीच्या सेवा कार्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आपल्या सेवा कार्याचा विस्तार करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळींनी घेतला. सेवाभारती इचलकरंजीचा सेवायज्ञ इचलकरंजी मध्ये जोमाने सुरु आहेच, पण ह्या सेवाकार्याचा विस्तार दर्जेदार आरोग्यसेवा तेही माफक दरात मिळणे हे दिवास्वप्न ठरावं अशी परिस्थिती असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचा अतिदुर्गम भाग शाहूवाडी तालुक्यात करण्याचा निर्णय विश्वस्तांनी वर्षभराच्या निरीक्षणानंतर स्थानिकांच्या मागणीनुसार केला.
डोंगराळ, जंगलसदृश भाग, पक्के रस्ते नाहीत, पावसाळ्याचे चार महीने तर घराबाहेर पडणेही मुश्किल अशा ठिकाणी नाममात्र दरात फिरते रुग्णालय ही आरोग्य सेवा सुरु करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळींनी घेतला. गरजू आणि आरोग्य सेवेपासून वंचित लोकांपर्यंत पोहोचणे हाच या पाठीमागचा उद्देश.
तोकडी शासकीय आरोग्य यंत्रणा, बोगस प्रॅक्टिशनर्सचा सुळसुळाट, चुकीच्या उपचार पद्धतींचा मारा आणि त्यावर रुग्णांचा मानसिक पगडा, वाहतुकीची सोय नाही अशा परिस्थितीत रुग्णांची हेळसांड होत होती. सुरुवातीला रुग्णांची मानसिकता बदलण्यासाठी डॉक्टरांना खुप मेहनत घ्यावी लागली. मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन असल्यामुळे कष्टाची कामे भरपूर होती. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या काही विशिष्ठ तक्रारी होत्या. झटपट आरामाच्या लोभापायी बोगस डॉक्टरांकडून चुकीच्या औषधांची सवय लावली गेली होती. हा प्रकार बंद करण्यासाठी लोकांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रबोधन केले. लोकांच्या कामाच्या वेळेनुसार त्यांना सोयीस्कर अशा वेळी डॉक्टरांनी आपली सेवा दिली.
आजच्या घडीला शाहूवाडी- मलकापूरच्या डोंगराळ परिसरातील 40 किलोमीटर च्या भागात 16 वाड्या- वस्त्यांवर ही आरोग्यसेवा अविरत सुरु आहे. लोकांचा या आरोग्यसेवेवर विश्वास आणि प्रतिसाद वाढला आहे.
विशेष बाब म्हणजे कोरोना आपत्ती काळात शासकीय आरोग्य यंत्रणेच्या बरोबरीने शाहूवाडी तालुक्यातील 80 वाड्या- वस्त्यांवर अंदाजे 4000 रुग्णांची तपासणी केली. महिलावर्ग आणि लहान मुले यांच्यात आरोग्याच्या चांगल्या सवयींबाबत जनजागृती करण्याची गरज याठिकाणी प्रकर्षाने जाणवते.
या प्रकल्पामध्ये स्थानिक डॉ. श्री. गजानन पाटील, डॉ. सौ. वीणा रवींद्र ठाणेकर, डॉ. ओंकार अंबिके हे आपली सेवा देतात. त्यांना श्री.महेश विभुते, श्री. अमर चौगुले, श्री. नंदकुमार गणेश कुलकर्णी ह्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभते.